व्हीएसआरएस मराठी न्युज –देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि स्वच्छतेसाठी युवकांसह नागरिकांनी पुढाकार घ्यावा, या हेतूने केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग सीजन २ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा या अभियानाचे आयोजन केले आहे. या अभियानांतर्गत देशभरातील सर्व शहरांमध्ये १७ सप्टेंबर रोजी इंडियन स्वच्छता लीग ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पिंपरी महानगरपालिकेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
आज थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने इंडियन स्वच्छता लीग २.० अंतर्गत स्वच्छता पंधरवड्यानिमित्त सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आरोग्य तपासणी व स्वच्छतेबाबत शपथही घेण्यात आली.
याप्रसंगी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त श्री. यशवंत डांगे, आरोग्य कार्यकारी अधिकारी श्री. गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी श्रीम. शितल वाकडे, जनता संपर्क अधिकारी श्री. प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
Discussion about this post