व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची लाट ओसरू लागली असून, गेल्या चार-पाच दिवसांपासून रुग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे नव्याने कोरोना होणाऱ्या रुग्णांना बेड सहज उपलब्ध होत आहेत. सध्या शहरात ६ हजार २०० बेड शिल्लक आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे.
रुग्णसंख्या घटत असल्याने महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात फक्त एका मजल्यावर कोरोना रुग्णांवर उपचाराची सोय करून या रुग्णालयांसह अन्य रुग्णालयांमध्ये नॉन कोविड रुग्णांवर उपचार सुरू केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, “फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. ही लाट आता ओसरत आहे. तरीही शहरातील सर्व नागरिकांनी काळजी घेण्याची गरज’ आहे. सध्या कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शहरात बेडची उपलब्ध आहेत. आजमितीला ६ हजार २०० बेड शिल्लक आहेत.
त्यामध्ये ३८ व्हेंटिलेटर, २९४ आयसीयू, २ हजार २४६ ऑक्सीजन आणि कोविड केअर सेंटरमधील २ हजार २०० बेडचा समावेश आहे. खासगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक आहेत. आता शहरात बेडची कमतरता नाही. त्यामुळे येत्या आठवड्याभरात शहरातील काही रुग्णालयांमध्ये नॉन-कोविड रुग्णांवर उपचार सुरु केले जाणार आहेत.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचा एक मजला कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या उर्वरित मजल्यांवर नॉन कोविड रुग्णांवर उपचारासाठी उपलब्ध केले जातील, असे त्यांनी सांगितले.”