Maharashtra : धाराशिव : मुरुम, तालुका उमरगा येथील उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाला अॅन्टीकरप्शन खात्याच्या छत्रपती संभाजीनगर येथील पथकाने लाच स्वीकारताना ३ मार्च रोजी पकडले आहे.
सईद अहमद मोहम्मद मकबूल अहमद, वय ५७ वर्ष, पद- मुख्याध्यापक आणि शहाजहान अब्दुल खय्यूम पटेल, वय ५४ वर्ष, पद- सहशिक्षक, डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल,मुरूम ता. उमरगा रा. मुस्लीमपाच्छापेठ, सोलापूर अशी या लाचखोर शिक्षकांची नावे आहेत.
या प्रकरणातील तक्रारदाराला त्याच्या बोनाफाईड आणि स्कूल लिव्हिंग सर्टीफिकेट हवे होते. त्यासाठी सईद अहमद याने सहा हजार रुपये लाच मागितली. वाटाघाटीनंतर ५ हजार ८०० रुपये घेण्यास संमती दर्शविली.
या प्रकरणी तकारदाराने अॅन्टीकरप्शन खात्याकडे तक्रार केली. या खात्याच्या अधिकार्यांनी सापळा लावला. ३ मार्च रोजी तक्रारदाराकडून शहाजहान पटेल याने सईद अहमद याच्यासाठी ५ हजार ८०० रुपये लाच स्वीकारली. त्यावेळी अॅन्टीकरप्शन खात्याच्या पथकाने त्याला आणि सईद अहमद याला अटक केली. या दोघांवर मुरुम. जि. धाराशिव येथील पोलीसठाण्यात ८९/२०२४ क्रमांकाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजीनगर संदीप आटोळे, अपर अधिक्षक,मुकुंद आघाव, उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नानासाहेब कदम व अंमलदार दिनकर उगलमुगले, आशिष पाटील, सिध्देश्वर तावसकर,अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांनी केली.
Discussion about this post