व्हीएसआरएस मराठी न्युज –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. महापालिकेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनासह इतर प्रकल्पांचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील भाजप आमदार, पदाधिकारी कार्यक्रमावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अण्णा बनसोडे हे देखील यावेळी उपस्थित होते. बनसोडे यांच्या उपस्थितीने यावेळी अनेकांचे लक्ष वेधले.
अण्णा बनसोडे हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याचा चर्चा आहे. राज्यातील सत्तापालटा पूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत देखील त्यांनी आपली नाराजी उघडपणे वक्त केली होती. तर मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत एकाच गाडीत प्रवास केल्याने मोठी चर्चा झाली होती.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची उघड मागणी बनसोडे यांनी केली होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लढवले जाणारे तर्कवितर्क, आजच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्याशी दिसून आलेला बनसोडे यांचा संवाद, यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित नवीन प्रशासकीय इमारतीचे
भूमिपूजन केले. नवीन प्रशासकीय इमारत १८ मजली होणार असून तीन बेसमेंट असणार आहेत.
इमारतीचे भूखंड क्षेत्र ८.६५ इतके आहे. ९१.५ हजार वर्ग मिटरचे बांधकाम होणार आहे.
याठिकाणी ६०० चारचाकी आणि ३ हजार दुचाकी वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था असणार आहे.
महापौर, उपमहापौर, आयुक्त, उपायुक्त, स्थायी समिती कार्यालय, बहुउद्देशीय व महानगरपालिका सर्वसाधरण
सभागृह यांच्यासह महानगरपालिकेच्या ६० विभागांची कार्यालये या ठिकाणी असणार आहेत.
इत्यादी सोयी सुविधांनी सुसज्ज अशी ही इमारत असणार आहे.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे , आमदार सर्वश्री महेश लांडगे , उमा खापरे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप , माजी महापौर माई ढोरे, पिंपरी चिंचवड मानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे आदी उपस्थित होते.
Discussion about this post