व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पोलीस संचलन मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस महासंचालक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल आदी उपस्थित होते.
पालकमंत्री यांच्या हस्ते यावेळी विविध पुरस्कारांचे प्रदान करण्यात आले. पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त आणि तत्कालीन पोलीस उप महानिरीक्षक गुन्हे शाखा रंजन कुमार शर्मा यांना एनसीआरबी नवी दिल्ली यांच्याकडून सीसीटीएनएस प्रणालीबद्दल सादरीकरणाबद्दल मिळालेले प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. ग्रामपंचायत टिकेकरवाडी (ता. जुन्नर) यांना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताहानिमित्त केंद्र शासनाचा ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत पुरस्काराबद्दल सन्मान करण्यात आला. पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आले. तसेच कामगार आयुक्ताल यांच्याकडील पुरस्कार पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक यांना, उद्योजकांना जिल्हा उद्योग केंद्राचे पुरस्कार, महसूल विभाग आदर्श तलाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध विभागात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रही यावेळी प्रदान करण्यात आले.
Discussion about this post