Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील निगडी, प्राधिकरण भागात राहणार्या एका व्यक्तीस घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत करता आली नाही म्हणून त्याचा फ्लॅट नावावर करून घेत त्याला शारीरिक व मानसिक त्रास देत फसवणूक करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून ७ खासगी सावकारी करणार्यांविरोधात चिखली पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू शंकर राणे (रा. निगडी प्राधिकरण), संजय शेलार (रा. चिंचवड स्टेशन), शाम तेलगू, रमेश औताडे, शाम हुज्जी, संतोष गाकवाड, चऱ्हाटे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर राजेंद्र किसन कदम (वय ५०) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यावरून आरोपींविरोधात भादंविक ३०६, ४२०, ४०६, ५०४, ५०६, ३४ तसेच सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत राजेंद्र कदम यांनी आरोपींकडून कर्ज घेतले होते. त्याची वेळेत परतफेड न करता आल्यामुळे आरोपींनी कर्ज काढून देतो असे सांगून कदम यांचा फ्लॅट नावावर करून घेतला. त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला.सन २०१४ ते १२ मार्च २०२४ या कालावधीत हा प्रकार चालू होता. त्याला कंटाळून कदम यांनी १२ मार्च रोजी शाहूनगर, चिंचवड येथे खटनिल हे विषारी किटकनाशक पिऊन आत्महत्या केली असे तक्रारीत म्हटले आहे.
Discussion about this post