Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वडमुखवाडी परिसरातील दाखलेबाज गुंडाचा पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये असलेल्या जगदंबा हॉटेलमध्ये जवळून गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली.
अविनाश बाळू धनवे (वय ३०, रा. वडमुखवाडी, चऱ्होली, पिंपरी-चिंचवड) असे मृताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पिंपरी चिंचवडमध्ये पाच ते सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तो आणि त्याचे मित्र शनिवारी रात्री कारने पंढरपूरला जात होते. रात्री आठच्या सुमारास जेवण्यासाठी ते इंदापुरातील जगदंबा या हॉटेलमध्ये थांबले. त्यावेळी त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या हल्लेखोरांनी हॉटेलात घुसून पाठमोरा असलेल्या अविनाशवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी डोक्यात शिरल्याने अविनाशचा मृत्यू झाला. हल्लेखोर कारमधून पसार झाले.
या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली. खुनाची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली असून हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीसपथके रवाना करण्यात आली आहेत.
Discussion about this post