Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील चिखली पोलीसठाण्याच्या हद्दीतील एका प्रतिष्ठित व्यक्तीस शेअरबाजारात गुंतवणूक केल्यास दामदुप्पट फायदा मिळेल असे आमिष दाखवून त्याला सुमारे साडेपंधरा लाख रुपयांचा गंडा घालणार्या ठकसेनाला बेड्या ठोकण्यात चिखली पोलिसांना यश आले आहे.
गुजराथमधील वडनगर येथून या भामट्याला ताब्यात घेण्यात आले आहे.दिनेशजी पथुजी ठाकोर, वय २६ वर्षे, धंदा नोकरी, राहणार छाबलीया तालुका वडनगर, जिल्हा मेहसाणा, राज्य गुजरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मे २०२३ मध्ये त्याने चिखली पोलीसठाण्याच्या हद्दीतील एका प्रतिष्ठित व्यक्तीला कॉल करून शेअरबाजारात गुंतवणूक केल्यास दामदुप्पट फायदा मिळेल असे आमिष दाखवले. सुरुवातीला त्या व्यक्तीने ५० हजार रुपये गुंतविले असता त्याला सव्वालाखाचा नफा झाल्याचे भासविले. त्याला गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाऊंट काढून देण्याचे आश्वासन देत पैशांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर चेतन पटेल आणि संजय पटेल यांच्यामार्फत शेअरट्रेडिंग करा असे सांगितले. त्यानंतर तोटा झाल्याचे भासवून पैसे भरा अन्यथा पोलीसकेस होईल अशी धमकी देऊन त्या प्रतिष्ठिताकडून १५ लाख ४७ हजार २५९ रुपये उकळले. फिर्यादी प्रतिष्ठित व्यक्तीने चौकशी केली असता त्याला आपल्या नावे डीमॅट अकाऊंटच नसल्याचे समजले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने चिखली पोलीसठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपीवर ३४१/२०२३ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ४२०,४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस आरोपीचा शोध घेत होते. संभाषणासाठी वापरण्यात आलेले फोन, बँक अकाऊंट यांचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर हा गुन्हा आरोपीने केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीचा मोबाईल बंद असल्याने आणि तो केवळ व्हॉट्सअॅपद्वारे इतरांच्या संपर्कात रहात असल्याने त्याला शोधणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. बर्याच परिश्रमानंतर आरोपी गुजराथमध्ये त्याच्या मूळगावी पळून गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याला पोलिसीखाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आणि ही रक्कम आपल्या नातेवाईकांकडे ठेवली असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीच्या नातेवाईकांनी ही रक्कम परत करतो असे न्यायालयाला सांगितले. पैसे परत करण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या दोन दिवसांच्या मुदतीत आरोपीच्या नातेवाईकांनी पूर्ण रक्कम परत केली. त्यामुळे फसवणूक झालेल्या त्या प्रतिष्ठिताने पोलिसांचे आभार मानले.
ही कामगिरी संदीप डोईफोडे उपआयुक्त परिमंडळ – ३, विवेक मुगळीकर, सहायक आयुक्त, एम आय डी सी विभाग,ज्ञानेश्वर काटकर, वरीष्ठ निरीक्षक चिखली पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोगले व हवालदार गोडांबे, मोहीते यांनी पार पाडली.
Discussion about this post