Pimpri News : पिंपरी : विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती डॉ. लालबाबू गुप्ता यांच्या चिखलीतील ‘अंबिका भवन’ या निवासस्थानी श्री राम जन्मस्ठळ अयोध्याधाम येथून अयोध्येतील मंदिरात प्राणप्रतिष्ठित केलेल्या मूर्तीसारखी हुबेहुब मूर्ती आणण्यात आली आहे. विश्व श्रीराम सेनेतर्फे रामनवमीच्या शुभमुहूर्तावर अंबिका भवन, चिखली येथे अनेक भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आणि रामललाच्या मूर्तीचे दर्शन ‘याची देही; याची डोळा’ घेण्यासाठी रामभक्तांचा जनसागर अंबिका भवन येथे लोटला आहे.
रामनवमीच्या पूर्वसंध्येला अष्टमीच्या मुहूर्तावर गोस्वामी तुलसीदास रचित ‘श्री रामचरित मानस’ या ग्रंथाचा अखंडपाठ सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी मुंबईहून साईराज चरित मानस प्रचार समितीचे ललित मिश्रा, हरिओम शुक्ला, विनोद कुमार, कृष्णकांत शुक्ला, पं. आद्याप्रसाद चतुर्वेदी,पं. मनोज चतुर्वेदी अंबिका भवनमध्ये दाखल झाले असून त्यांच्या करवी अखंड संगीतमय रामचरित मानस पाठ सुरू झाला आहे.
आज १६ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. याचे पौराहित्य पंडित विनोद मिश्रा शास्त्री करीत आहे. कार्यक्रमाचे यजमान विश्व श्री राम सेना सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ लालबाबू गुप्ता यांच्या हस्ते त्यांनी पाठपूजन, ब्राह्मण पूजन, संकल्प पूजन व महाआरती आदी विधी सांगोपांग करून घेतले.
महाआरती झाल्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली ती रामललाची मूर्ती. ज्या भाविकांना आज अयोध्या येथे जाणे शक्य नाही त्यांनी या मूर्तीचे दर्शन घेतले. रामललाचे रुपडे डोळ्यात साठवून घेणार्या काही भाविकांच्या डोळ्यात यावेळी आनंदाश्रू तरळले.
यावेळी डॉ. लालबाबू गुप्ता यांनी चिखली, पिंपरी चिंचवड सह सर्व राज्य, भारत देश आणि अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी श्रीराम चरणी प्रार्थना केली आहे. या जगातील अवघे प्राणीमात्र सदासुखी राहोत. त्यांच्यामध्ये बंधुभाव वाढीस लागो, असे मागणे त्यांनी रामललाकडे मागितले आहे.
डॉ. लालबाबू गुप्ता यांचे बंधू प्रमोद गुप्ता यांनी या महोत्सवासाठी सलग ९ दिवस उपवासाचे व्रत केले होते. महाआरती आणि धार्मिकविधीच्यावेळी त्यांनी उच्चरवात केलेल्या देवदेवतांच्या आवाहनाचा नाद पूजनस्थळी गुंजला. उपस्थित भाविकांनी यावेळी त्यांच्या सूरात सूर मिसळला.
उद्या १७ एप्रिल रोजी दीड वाजता महायज्ञ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे दुपारी दोन वाजता श्रीराम जयंती निमित्त रामललाच्या मूर्तीची चिखली परिसरात चांदीच्या पालखीतून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये रामभक्त मोठ्यासंख्येने सहभागी होणार आहेत.
Discussion about this post