Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील देहुरोड पोलीसठाण्यातील कर्मचार्याला १५ एप्रिल रोजी रात्री ड्यूटी संपवून घरी जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचार्याचा मृत्यू झाला. धडक देणारा पसार झाला असून हा अपघात की घातपात असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सचिन नरुटे (वय 38, रा. वाकड) असे मृत पोलिसाचे नाव आहे. नरुटे सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आपली ड्यूटी संपवून मुंबई बंगळुरु महामार्गावरून आपल्या मोटारसायकल क्रमांक एमएच 14/जीव्ही 7750 ने वाकडकडे निघाले असता रावेत नजिक त्यांना एका अज्ञात वाहनाने उडविले. उडविणारे वाहन न थांबता पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत नरुटे यांना नजिकच्या रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
नरुटे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली आहेत. त्यांच्या मृत्युमूळे पोलीसदलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Discussion about this post