Pimpri News : पिंपरी : मावळातील एका अॅग्रो कंपनीत काम करणार्या व्यक्तीने मॅनेजर सतत काम सांगतो म्हणून त्याला घरी जात असताना रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. या मध्ये गंभीर जखमी झालेल्या मॅनेजरचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुमार ओझरकर (वय 25, रा. शिवणे, मावळ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात कंपनीतील कर्मचारी किरण मानसिंग भोसले (वय 47, रा. मावळ) यांनी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.सुधीर मच्छिंद्र अडसूळ (वय 47, रा. बेबड ओहळ ता. मावळ मूळगाव बाभूळगाव ता.बार्शी सोलापूर) असे मृत मॅनेजरचे नाव आहे.
ही घटना दि. १९ मार्च रोजी सायंकाळी घडली. मृत अडसूळ आणि आरोपी ओझरकर एका अॅग्रो कंपनीत कामाला होते. अडसूळ आरोपी ओझरकरला सतत काम सांगत असत. त्याचा राग आरोपीला येत असे. यातून त्यादोघांमध्ये अनेकदा खटके उडाले होते. या रागातून मंगळवारी सायंकाळी अडसूळ मोटारसायकलवरून घरी जात असताना आरोपीने आपल्या साथीदारासह त्यांना रस्त्यात गाठले. लोखंडी पाईपने त्यांना जबर मारहाण केली. यामुळे जखमी झालेल्या अडसूळ यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा २० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला.
मॅनेजर सतत काम सांगत असल्याचा राग मनात धरून कामगाराने मॅनेजरला मृत्यू होईल इतपत गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान मारहाणीचा हा गंभीर प्रकार घडला. त्यानंतर मॅनेजर सुधीर मच्छिंद्र अडसूळ (वय 47, रा. बेबड ओहळ ता. मावळ मूळगाव बाभूळगाव ता.बार्शी सोलापूर) यांचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक प्रकाश पारखे करत आहेत.
Discussion about this post