Pimpri News : पिंपरी : एका मध्यमवयीन महिलेशी सोशल मीडियावर मैत्री करून तिला भेटायला बोलावून तिच्यासोबत त्यावेळी काढलेले फोटो मॉर्फींग करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्या महिलेकडून ३४ तोळे सोन्याचे दागिने उकळणार्या एका तरुणाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे.
सुरज लक्ष्मण परमार उर्फ सुरज जैन उर्फ सुरेश भिवशी कदम उर्फ द्रिश मालपाणी वय २८ वर्षे सध्या रा. सुनिल कापरे यांचे घरी भाड्याने, शेवंता निवास, सर्वे नंबर ९०, संकेत पार्क २, सय्यदनगर, पुणे असे या आरोपीचे नाव आहे.
त्याने निगडी परिसरातील एका मध्यमवयीन महिलेशी सोशल मीडियावर मैत्री केली. आपण मोठ्या उद्योजक घराण्यातील असल्याचे भासविले. तिला भेटायला बोलविले. तिच्यासोबत फोटो काढले.
त्यानंतर हे फोटो मॉर्फ करून ते सोशलमीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्या महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून ३४ तोळे सोन्याचे दागिने उकळले. आणखी दागिन्यांची मागणी आरोपी करत होता. ते देण्यास त्या महिलेने नकार दिल्यानंतर त्याने त्या महिलेचे फेसबुक अकाऊंट आपल्या मोबाईलमध्ये चालू करून त्यावरून मॉर्फ केलेले फोटो सोशलमीडियावर व्हायरल केले.
त्यानंतर त्या महिलेने निगडी पोलीसठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपीविरुद्ध ११९ /२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम-३८४,३८६, ५००, ५०१, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) तेजस्विनी कदम व त्यांच्या सहकार्यांनी सुरू केला. आरोपीने वापरलेल्या फेसबुक अकाऊंटचे विश्लेषण सहायक पोलीस निरीक्षक अंबरिश देशमुख यांनी केले. आणि, त्याची खरी ओळख शोधून काढली. पोलीस पथकाने पुण्यातील सय्यदनगर, हडपसर परिसरात सतत ३ दिवस पाळत ठेवून त्याला २३ मार्च रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून तपास केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी फसवणूक झालेल्या महिलेचे विकलेले दागिने आणि मॉर्फ केलेले फोटो हस्तगत केले आहेत.
तपासाअंती त्याने अशाच प्रकारे अनेक महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.यापुर्वी द्रिश मालपाणी या नावाने आपण संगमनेर येथील मालपाणी या नामांकित कुटुंबातील असल्याचे भासवून त्याने नवी मुंबई येथील एका महिलेला ९३ लाख रुपयांना फसविल्याचा गुन्हा त्याच्यावर तुर्भे पोलीस ठाणे नवी मुंबई येथे दाखल आहे.त्याला दत्तक घेणाऱ्या सोलापूर येथील एका महिलेचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत केल्याबद्दल त्याच्यावर पुण्यातील स्वारगेट पोलीसठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत पाहता त्याने अशाच प्रकारे अन्य काही महिलांचीही फसवणूक केली असल्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे. जर अशाप्रकारे कोणा महिलेची फसवणूक झाली असेल तर त्यांनी निगडी पोलीसठाण्याशी संपर्क साधावा. त्या स्त्रियांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन निगडी पोलिसांनी केले आहे.
ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक शत्रुघ्न माळी, निरीक्षक (गुन्हे) तेजस्वीनी कदम, सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख, उपनिरीक्षक महादेव यलमार, तपास पथकातील भगवान नागरगोजे, सुधाकर अवताडे, शिवाजी नागरगोजे, सिद्राम बाबा, भूपेंद्र चौधरी, राहुल गायकवाड, विनोद होनमाने, दत्तात्रय शिंदे, तुषार गेंगजे, विनायक मराठे, सुनील पवार, नूतन कोंडे यांनी केली.
Discussion about this post