Pimpri News : पिंपरी : किवळे येथील नामांकित महाविद्यालयात शिकणार्या एका परप्रांतीय विद्यार्थ्याला गांजाच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडे २० लाख रुपयांची मागणी करणार्या देहुरोड पोलीसठाण्यातील दोन पोलिसांसह अन्य सहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वांनी त्या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याच्याकडून ४ लाख ९८ हजार रुपये उकळले आहेत.
या प्रकरणी वैभवसिंग मनीषकुमार सिंग चौहान (वय 19, रा. किवळे, पुणे. मूळ रा. झारखंड) याने देहुरोड पोलीसठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस नाईक हेमंत गायकवाड आणि शिपाई सचिन शेजाळ अशी दोन पोलिसांची नावे असून त्यांच्यासह अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा, शंकर गोरडे, मुन्नास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या पैकी अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा यांना अटक करण्यात आली आहे.
वैभव हा किवळे येथील एका महाविद्यालयात शिकत असून तो हॉस्टेलमध्ये राहतो. १० फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास तो गहुंजे येथील मायाज लाऊंज या कॅफेमध्ये बसला असताना आरोपींनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला देहुरोड पोलीसठाण्यात नेण्यात आले. तेथे त्याला गांजाच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली.त्याने घाबरून आजवर ४ लाख ९८ हजार रुपये गुगल पे आणि नेटबँकिंगद्वारे दिले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Discussion about this post