पुणे : पुण्यातील युवक कॉंगेसच्या कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वाद झाला. विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जिल्हा उपाध्यक्षांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पदाधिकारी नियुक्तीवरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते.
विद्यार्थी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल संभाजी पिसाळ यांनी रविवारी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.त्यावरून विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख (वय-35), भुषण रानभरे (वय-30), युवराज नायडू (वय-35), राज जाधव (वय-28) यांच्यावर भादंवि कलम 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहरातील कॅम्पस अध्यक्षपदावरून शहराध्यक्ष अभिजित गोरे आणि प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांच्यात वाद झाला. गोरे यांच्याकडे जिल्ह्यातील संघटनेची पदे वाटप आणि नियुक्त्या करण्याचा अधिकार आहे. प्रदेशाध्यक्ष शेख यांनी आणि कोथरुड विभागाचे माजी अध्यक्ष राज जाधव यांनी भारती विद्यापीठ कॅम्पस, कोथरुड अध्यक्षपद एका विद्यार्थ्याला परस्पर दिले. यातून वाद उद्भवला असे समजते.
शनिवारी पिसाळ हे काँग्रेसभवन येथे गेले होते. त्यावेळी अमीर शेख आणि त्यांचे 30-40 कार्यकर्ते तेथे होते. त्यावेळी दोघात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर आरोपींनी पिसाळ यांना मारहाण केली असे तक्रारीत म्हटले आहे.
Discussion about this post