व्हीएसआरएस मराठी न्युज -पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहनांना थांबण्यास परवानगी नसतानाही, पावसाळ्यामुळे लहान मोठे धबधबे पाहण्यासाठी घाट रस्त्यांच्या बाजूला बोगद्याजवळील मार्गालगत वाहने थांबविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
परिणामी महामार्गावर वाहतूक कोंडी होत असून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन – एमएसआरडीसी) वाहतूक पोलिसांच्या मदतीने गर्दी किंवा धबधब्यांच्या ठिकाणी आवर्जून थांबणाऱ्या वाहनांवर आता कारवाई केली जाणार आहे. अशी ठिकाणे महामंडळाने निश्चित केली आहेत.
पावसाळ्यामध्ये पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर विशेषतः ओडोशी बोगदा, खंडाळा बोगदा, लोणावळा घाट आणि डोंगरमाथ्यामधून जाणार्या नागमोडी वळणांच्या ठिकाणी छोटे मोठे धबधबे वाहतात. तसेच निसर्गरम्य वातावरण असल्याने या ठिकाणी वाहनचालक सर्रास महामार्गालगत वाहने लावतात. धबधब्यांवर तसेच घाटरस्त्यात गर्दी करत आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, तर अनेक ठिकाणी अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या तक्रारी महामंडळाकडे प्राप्त झाल्या आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी धोकादायक ठिकाणांच्या माहितीचे फलक आणि वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस आणि महामंडळाचे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तरीदेखील वाहन थांबविणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांना सूचना देण्यात आल्या असून अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच महामार्गावर वाहतूक कोंडी किंवा अपघात घडत असतात आपात्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी रस्ते महामंडळाचे विविध टप्प्यात सहा सुमो कार, गस्ती पथक, डेल्टा फोर्स, १२ दुचाकी वाहने आणि इतर कर्मचारी मदतीसाठी कार्यरत आहेत. गर्दीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस आणि महामंडळाचा एक कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. – राकेश सोनवणे, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी
Discussion about this post