Uttar Pradesh : लखनौ : प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे दीर्घ आजाराने लखनौ येथील संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.
उर्दू साहित्यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ त्यांनी हा पुरस्कार परत करत सरकारी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. ते देशातील प्रसिद्ध शायर होते. उर्दू, हिंदी आणि अवधी भाषेत त्यांनी लेखन केले होते. वेगळ्या धाटणीच्या गझला हे त्यांचे वैशिष्ट्य होते.आपल्या दमदार आवाजात ते गझला सादर करू लागले की श्रोत्यांच्या मनावर त्यांचे गारुड निर्माण होत असे.
गेली अनेक वर्षे ते किडनीविकाराने आजारी होते.त्यामुळे त्यांना आठवड्यातून तीन वेळा डायलेसिस करावे लागत होते.काही दिवसांपूर्वी छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना न्युमोनिया झाला. गेले काही दिवस ते ऑक्सिजन सपोर्टवर होते. उपचार सुरू असताना आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
Discussion about this post