व्हीएसआरएस मराठी न्युज -शहरातील आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशामक मोटार सायकलद्वारे पेट्रोलिंगद्वारे लक्ष ठेवले जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही कारणास्तव आग लागून दुर्घटना घडू नये, यासाठी महापालिकेच्या वतीने उपाययोजना म्हणून खबरदारी घेतली जात असून २४x७ फायर फायटर वाहनांचे पथक सज्ज ठेवण्यात आले असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी सांगितले. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी शहरातील काही भागात सायंकाळी ७ ते रात्री साडे दहाच्या सुमारास फटक्यांमुळे नऊ ठिकाणी लागलेल्या मध्यम स्वरूपाच्या आगीवर या वाहनांद्वारे तात्काळ नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहितीही गावडे यांनी यावेळी दिली.
महापालिकेच्या वतीने शहरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याठिकाणी तातडीने सेवा व मदत पोहचवण्यास कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी तसेच मोठ्या अग्निशामक गाड्यांना घटनास्थळी तातडीने पोहचवण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक बाजूला करण्याकरिता अग्निशामक मोटार सायकलचा वापर करण्यात येत आहे. घटनास्थळी ४० लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या मोटार सायकल सोबत प्रथमोपचार पेटी, अग्निशामक वायू, ध्वनिक्षेपक यंत्र असे साहित्य देखील आहे.
Discussion about this post