व्हीएसआरएस मराठी न्युज –शहरातील रस्त्यांच्या सौंदर्यीकरणाच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरी सहभाग आणि नाविन्यता यांचा योग्य मेळ घालणे आवश्यक असून सार्वजनिक परिसर पादचाऱ्यांसाठी, लहान मुलांसाठी आणि रहिवाशांसाठी उत्साहवर्धक बनवण्याचा महापालिकेचा उद्देश आहे.
त्यासाठी देशातील अनुभवी तज्ञांच्या सहकार्याने आम्ही हरित सेतू नावाचा अभिनव उपक्रम अंमलात आणणार आहोत. या उपक्रमाच्या यशस्वी पुर्ततेसाठी ‘शहरी रस्ते व सार्वजनिक परिसर विकास राष्ट्रीय कार्यशाळा नक्कीच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत शहरी रस्ते आणि सार्वजनिक परिसर नागरिकांना केंद्रबिंदू मानून विकसित करण्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये ‘शहरी रस्ते व सार्वजनिक परिसर विकास’ या राष्ट्रीय कार्यशाळांच्या मालिकेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळांचा उद्देश प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे तसेच चर्चेद्वारे रस्ते बांधणीच्या आधुनिक उपाययोजनांवर चर्चा करणे, रस्ते बांधणीच्या टिकाऊपणावर लक्ष केंद्रित करणे आणि रहदारी टाळण्यासाठी विविध उपाययोजना करणे हा आहे. पिंपरी चिंचवड शहरातही या मालिकेतील तिसऱ्या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन निगडी येथील ग.दि.माडगूळकर प्रेक्षागृह येथे दि. १२ व १३ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा पहिला दिवस आज पार पडला, त्यावेळी आयुक्त सिंह बोलत होते.
या कार्यशाळेवेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, मनोज सेठीया, उपआयुक्त मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, शिरीष पोरेडी, लक्ष्मीकांत कोल्हे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, परवानाकृत व्यावसायिक वाहतूक संचालन अभियंता प्रताप भोसले, अभिमान भोसले, पर्यावरण शिक्षण केंद्राचे वरिष्ठ कार्यक्रम समन्वयक अमर करण, स्मार्ट सिटी सल्लागार विकास ठाकर, प्रांजली देशपांडे, प्रसन्न देसाई यांच्यासह ४३ शहरांमधील स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांसह उच्चपदस्थ अधिकारी आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post