व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी: निगडी अमरधाम स्मशानभूमी समोरील रस्त्यावर असणारे स्टॉम वॉटर ड्रेनेज हे रस्त्याला समांतर नसल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना याचा वेळोवेळी मनस्ताप सहन करावा लागत होता. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत स्टॉम वॉटर ड्रेनेजच्या दुरुस्तीची मागणी केली होती. अखेर या स्टॉम वॉटर ड्रेनेजची दुरुस्ती करण्यात आली.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी निगडीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वसाहत येथील नाल्यापासून ते आझाद चौकापर्यंत स्टॉम वॉटरची लाईन टाकण्यात आली होती. सदर लाईन टाकत असताना ठिकठिकाणी ड्रेनेज बनवण्यात आले होते. तसेच निगडी अमरधाम स्मशानभूमी समोरील रस्त्यावर बनविण्यात आलेल्या ‘स्टॉम वॉटर ड्रेनेज’ हे रस्त्यापेक्षा अधिक उंच असल्याने व रस्त्याला समांतर नसल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना याचा वेळोवेळी मनस्ताप सहन करावा लागत होता. या ड्रेनेजमुळे अनेक वाहने स्लीप होण्याचे प्रकार घडले होते . यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. तक्रार करून अनेक महिन्यांचा कालावधी उलटून देखील तक्रारीचे निवारण करण्यात न आल्याने खैरनार यांनी जनसंवाद सभा,संबंधित अधिकारी तसेच महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर ( PCMC SARATHI HELPLINE Grievance Token No. H200326 ) तक्रार केली होती. अखेर तक्रारीची दखल घेत ‘स्टॉम वॉटर ड्रेनेज’ची उंची रस्त्यास समांतर करण्यात आली.
Discussion about this post