Pimpri News : पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारासाठी भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी शहरात १०० हून अधिक नमो संवाद सभा घेण्याचे सत्र सूरू केले आहे.
मोदी सरकारची गेल्या दहा वर्षांतील कामगिरी सांगताना राममंदिर, मेट्रो, महामार्ग, डिजिटल इंडिया, कल्याणकारी योजना आणि विकसित भारताचा संकल्प अशा विविध विकासात्मक विषयांवर भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आतापर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात २० नमो संवाद सभा घेऊन जवळपास ५० हजार मतदारांशी संवाद साधला. या सभांमध्ये मतदारांची मतेही जाणून घेण्यात येत आहेत. मावळ लोकसभेसाठी श्रीरंग बारणे आणि शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर १०० हून अधिक नमो संवाद सभा महायुतीच्या सभा म्हणून शहरात ठिकठिकाणी सुरू आहेत.
मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने पक्ष पदाधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवून लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदारसंघात शहराध्यक्ष शंकर जगताप हे सातत्याने जनसंपर्क ठेवत आहेत. गेल्या पाच-सहा दिवसांत त्यांनी स्वतः चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये दररोज किमान ४ ते ५ नमो संवाद बैठका घेण्याचा धडाका लावला आहे. वाकड, कावेरीनगर, पिंपळेनिलख, विशालनगर, काळभोरनगर, शिवनगरी, बिजलीनगर, पिंपळेगुरव, जवळकरनगरसह पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध प्रभागांमध्ये नमो संवाद सभा पार पडल्या आहेत. या सभांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता महायुतीच्या एकत्रित सभा घेण्यात येणार असून, याकरिता नियोजन करण्यात आल्याचे भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले आहे.
Discussion about this post