व्हीएसआरएस मराठी न्युज –फुगेवाडी ते वनाज अशी मेट्रो चाचणी यशस्वी झाली आहे. त्यानंतर काही चाचण्या अजून घेण्यात येतील. त्यानंतर कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) आणि रेल्वे विभागाची मान्यता घेण्यात येईल. सर्व परवानग्या व मान्यता मिळाल्यानंतर नियोजन करून मेट्रो नागरिकांच्या प्रवाशासाठी खुली केली जाईल. पिंपरी ते वनाज मार्गासाठी 40 रूपये तिकीट असेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या भाडे दरानुसार तिकीटाचे दर निश्चित करण्यात आले आहेत, असे महामेट्राचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बि-जेश दीक्षित यांनी सांगितले.
वर्षांच्या शेवटच्या दिवशी ही चाचणी घेण्यात आली. फुगेवाडी स्टेशन येथून सकाळी साडे दहा वाजता मेट्रो निघाली. ती दापोडी, बोपाडी, खडकी, रेंजहिल्स, शिवाजीनगर मार्गावरून सकाळी 11.15 ला सिव्हिल कोर्ट स्टेशन येथे पोहोचली. या चाचणीसाठी 45 मिनिटांचा कालावधी लागला. तेथून सकाळी 11.20 ला मेट्रो निघून 11.45 ला वनाज स्टेशन येथे ती पोहोचली. या चाचणीस 25 मिनिटांचा कालावधी लागला. ही चाचणी यशस्वी झाल्याचे मेट्रोच्या अधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या 2 ते 3 महिन्यांत या मार्गावर पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील नागरिकांना मेट्रोचा प्रवास करता येणार आहे.
ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बि-जेश दीक्षित यांनी दोन्ही महापालिकांसह विविध आस्थापना तसेच, नागरिक व मेट्रोच्या अधिकारी व कर्मचार्यांचे अभिनंदन केले.
Discussion about this post