व्हीएसआरएस मराठी न्युज –मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मोर्चात मोठ्या संख्येने मराठा बांधव वाहनांसह सहभागी होणार आहेत. त्यामुळे २३ आणि २४ जानेवारी रोजी पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील मोर्चा मार्गावर आणि परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मोर्चा मंगळवारी,
२३ जानेवारी रोजी रांजणगांव येथून कोरेगाव भीमामार्गे चोखीदाणी, खराडी येथे मुक्कामी थांबणार आहे. २४ जानेवारी रोजी चोखीदाणी, खराडी येथून पिंपरी चिंचवड परिसरातून लोणावळा येथे मुक्कामी थांबणार आहे.
पर्यायी मार्ग
२३ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजल्यापासून अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.
मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरुन तसेच कोल्हापूर, सातारा येथून अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज – खडी मशिन चौक मंतरवाडी फाटा हडपसरमार्गे सोलापूर रस्त्याने केडगांव चौफुला – नाव्हरे शिरुरमार्गे जातील.
वाघोली, लोणीकंदमार्गे अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची थेऊर फाटा (सोलापूर रस्ता) येथून वाहतूक केडगांव चौफुला नाव्हरामार्गे शिरुर ते अहमदनगर अशी वळविण्यात येईल.
पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने खराडी बायपास उजवीकडे वळण घेऊन मगरपट्टा चौकातून डावीकडे वळून सोलापूर रस्त्याने यवत केडगांव चौफुला – नाव्हरे शिरुरमार्गे जातील.
बुधवारी, २४ जानेवारी रोजी मराठा आरक्षण मोर्चा पुणे शहरातून पिंपरी चिंचवडच्या दिशेने जाणार आहे. त्याअनुषंगाने वाहतुकीत आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येतील. अहमदनगरहून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा (लोणीकंद) येथून केसनंद थेऊरमार्गे सोलापूर रस्ता अशी वळविण्यात येतील. वाघोली परिसरामधील वाहने वाघोली आव्हाळवाडी मांजरी खुर्द- मांजरी बुद्रुक – केशवनगर – मुंढवा चौक अशी वळविण्यात येतील.
पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना चंद्रमा चौकातून आळंदी रस्ता जंक्शन, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगांव, वाघोलीमार्गे अहमदनगरकडे अशी वळविण्यात येईल.
मराठा आरक्षण मोर्चा जसजसा पुढे मार्गस्थ होईल, त्याप्रमाणे मोर्चाच्या मागील वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी या वाहतूक बदलांचा अवलंब करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
Discussion about this post