Ayodhya News : अयोध्या : अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधीसाठी देशभरातील संत, महंत, राजकीय नेते, खेळाडू, अभिनेते यांना निमंत्रणे पाठविण्यात आली होती मात्र इंडिया आघाडीतील घटकपक्षांच्या अनेक नेत्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यामुळे आपण प्रभू श्रीराम विरोधी आहोत असा संदेश जनतेत जाऊ नये म्हणून या नेत्यांनी अन्य ठिकाणी पूजापाठ करण्याचे ठरविले असल्याचे वृत्त आहे.
काँग्रेस पक्ष
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनाही मंदिर ट्रस्टने अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले होते, परंतु त्यांनी या सोहळ्यापासून दूर राहण्याचे जाहीर केले.राहुल गांधी आसाममध्ये असल्याने ते कामाख्या देवी मंदिराला भेट देऊ शकतात. यासोबतच पक्षाचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी सांगितले की, वेळापत्रकानुसार राहुल गांधी नागाव जिल्ह्यातील वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थान बोरदोव थानलाही भेट देणार आहेत.
टीएमसी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही मंदिर ट्रस्टने या सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवले होते. मात्र, त्या अयोध्येला न जाता कोलकाता येथील कालीघाट मंदिरात जाऊन पूजा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच आज कोलकाता येथे सद्भावना रॅली काढण्यात येणार असून त्यात हजारो लोक सहभागी होणार आहेत. या रॅलीची खास गोष्ट म्हणजे ही रॅली मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा अशा प्रत्येक धार्मिक स्थळातून जाणार आहे.
शिवसेना (UBT)
शिवसेनेचे (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते, मात्र ते देखील राजकीय कार्यक्रम असल्याचे सांगून या कार्यक्रमापासून दूर राहिले आहेत. दर्शनासाठी ते आज सायंकाळी नाशिकच्या काळाराम मंदिरात पोहोचतील. तसेच काळाराम मंदिराच्या महाआरतीलाही ते उपस्थित राहणार आहेत. प्रभू रामाचे हे मंदिर दलितांच्या मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाचे प्रतीक मानले जाते. आज उद्धव ठाकरे विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मस्थळालाही भेट देऊ शकतात.
आम आदमी पार्टी
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रकही अयोध्येला जाणार नाहीत. आज त्यांनी दिल्लीत रॅली काढण्याचे ठरविले आहे. या यात्रेत अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. याशिवाय दिल्लीत विविध ठिकाणी पक्षातर्फे भंडाराहीआयोजित केला आहे. प्राणप्रतिष्ठापूर्वीच २० जानेवारीपासून दिल्लीतील प्यारेलाल भवन येथे रामलीला आयोजित केली जात आहे.
बहुजन समाज पक्ष
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनाही मंदिर ट्रस्टने निमंत्रित केले आहे. त्यांनी यासाठी मंदिर ट्रस्टचे आभार मानले असले तरी पक्षाच्या बांधिलकीमुळे त्या या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. 22 जानेवारीनंतर त्या रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहेत.
समाजवादी पक्ष
22 जानेवारीला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनाही आमंत्रित करण्यात आले होते, मात्र त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिला. त्यांनी आमंत्रणासाठी मंदिर ट्रस्टचे आभार मानले, परंतु 22 जानेवारीनंतर कुटुंबासह भेट देण्यासाठी ते अयोध्येला जातील.
राष्ट्रीय जनता दल
आरजेडी प्रमुख लालू यादव यांनाही आमंत्रित करण्यात आले होते, त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. मात्र, त्यांनी निमंत्रण का नाकारले याचे कोणतेही स्पष्ट कारण समोर आलेले नाही.
जनता दल युनायटेड
जेडीयू प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही राम मंदिराच्या वतीने निमंत्रण पाठवले होते. अशी माहिती पक्षनेत्याने दिली. मात्र, ते या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही याबाबत संदिग्धता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही मंदिर ट्रस्टने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते, मात्र त्यांनी मंदिर ट्रस्टच्या प्रमुखांना पत्र लिहून कृतज्ञता व्यक्त करत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहता येणार नसल्याचे कळविले होते, मात्र त्यांनी नंतर दर्शनासाठी येणार असल्याचे म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना 22 जानेवारीचे निमंत्रणही पाठवण्यात आले होते, मात्र त्यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. भाजप आणि आरएसएसने या कार्यक्रमाला राजकीय प्रचार बनवल्याने आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
Discussion about this post