व्हीएसआरएस मराठी न्युज –सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे १२४ बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास ४३० कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासले नाही.
यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले. सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी २०२० मध्ये या कर्जांविषयीचे ऑडिट केले होते. त्यानंतर हे घोटाळा उघडकीस आले. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी अमर मूलचंद यांच्यासह पाच जणांना अटक केली होती.
सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानी यांच्याकडे २७ जानेवारी रोजी ईडीने छापेमारी केली होती. त्यांच्या कार्यालय व घरांवर छापे टाकले होते. मूलचंदानी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या जवळच्या व्यक्तींना बँकेकडून कर्ज वाटप करुन एकूण 400 कोटींहून अधिकचा घोटाळा केला होता.
याप्रकरणी मूलचंदानीसह पाच जणांना अटक झाली होती. परंतु अमर मूलचंदानी जामिनावर बाहेर आले होते. त्यानंतर पुन्हा त्याच्यावर ईडीकडून कारवाई झाली. यामुळे त्यांनी ईडीच्या मुंबई कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना हाताशी धरले.त्या कर्मचाऱ्यांकडून तपासासंबंधीचे अपडेट्स मिळवत होते. ही माहिती ईडीला मिळाली. त्यानंतर ईडीने त्या दोन्ही कर्मचाऱ्यांना अटक केली.
दोन कर्मचारी अमर मूलचंदानीच्या ड्रायव्हरच्या संपर्कात होते, अशी माहिती ईडीला मिळाली होती. त्यानंतर दोघांवर नजर ठेवण्यात आली. या दोघांनी मूलचंदानीला काही कागदपत्रे विकल्याचे ठोस पुरावा ईडीला मिळाला. त्यानंतर दोघांना व मूलचंदानी यांच्या चालकाला अटक करण्यात आली. या तिघांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Discussion about this post