व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बिहारला निघालेल्या रेल्वेमध्ये चढताना एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून ही घटना शनिवार, २२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता पुणे रेल्वे स्थानकावर घडली आहे. साजन बलदेव मांझी (वय ३०, रा. कानती नवादा, गया, बिहार) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
साजन व त्याचा पुतण्या बौधा मांझी हे दोघे १५ दिवसांपूर्वी बिगारी कामाकरीता पुण्यात आले होते. साजन हा आजारी होता. दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पुणे- दानापूर (पाटणा) ही गाडी पुण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आली. यावेळी गाडीत चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली.
यावेळी साजन हा गाडीमध्ये चढत असताना गर्दीत अडकल्याने आणि दम लागल्याने त्याला त्रास होऊन तो प्लॅटफॉर्मवर कोसळला. त्यावेळी त्याचा पुतण्या, लोहमार्ग पोलिसांनी आणि अन्य प्रवाशांनी बेशुद्धावस्थेतील साजन याला लाेहमार्ग रुग्णलायात दाखल केले. मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
बिहारला जात असताना त्याची प्रकृती रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच अतिशय खालावली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचा दावा पुणे रेल्वे विभागाने केला आहे. साजन बलदेवन सोबत असलेल्या त्याच्या इतर सहकारी मित्रांनी देखील त्याला दम्याचा आजार असल्यास पोलीस पुणे रेल्वे पोलीस विभागाला कळवल आहे.
Discussion about this post