Pune News : पुणे : व्होडाफोन या मोबाईल कंपनीच्या कार्यालयातून १६ एप्रिल रोजी ५४ लाख रुपयांचे उपकरण चोरीस गेले होते. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणाचा चिकाटीने तपास करून तीन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेला ऐवज दिल्ली येथून जप्त करण्यात यश मिळविले आहे.
भरमू बिरप्पा पुजारी, वय ३९ वर्षे, धंदा सिक्युरिटी गार्ड, रा. गुरूकृपा बिल्डींग रुम नं. ०३ लिपाणेवस्ती, जांभुळवाडी रोड, कात्रज, पुणे, दिपक मुरलीधर तडके वय ४८ वर्षे धंदा टेक्नीशियन रा. शांतीरक्षक सोसायटी, सी विंग, फ्लॅट नं ४७, नागपूरचाळ, येरवडा, पुणे आणि प्रितमकुमार कामताप्रसाद कमल, वय ३२ वर्षे, धंदा केबलिंग, रा. रोहिदास निवास, पहिला मजला, कोल्हेवाडी, खडकवासला, पुणे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पुण्यातील स्वारगेट येथील वेगासेंटर चौकात व्होडाफोन या मोबाईल कंपनीचे ऑफीस आहे. या ऑफीसमधून ५४ लाख ५४ हजार रुपयांचे लाईनकार्ड नावाचे उपकरण १६ एप्रिल रोजी अज्ञात चोरांनी चोरून नेले होते. या प्रकरणी स्वारगेट पोलीसठाण्यात १३७/२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ३८१,४११,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच तांत्रिक विश्लेषण करून आरोपींना ताब्यात घेतले.
भरमू पुजारी आणि दीपक तडके यांनी हे कार्ड प्रितमकुमार कमल याला दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने हे कार्ड दिल्ली येथे पाठविल्याचे सांगितले. पोलिसांचे पथक दिल्ली येथे गेले. त्यांनी तेथून हे कार्ड ताब्यात घेतले.
ही कामगिरी पोलीस उपआयुक्त, परिमंडळ – २ स्मार्तना पाटील सहायक आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या आदेशाप्रमाणे सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक येवले व अंमलदार संदीप घुले, सोमनाथ कांबळे, अनिस शेख, शिवा गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, दिपक खेंदाड, प्रविण गोडसे यांनी केली.
Discussion about this post