Pune News पुणे : पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात अफूची लागवड करणार्या दोन शेतकर्यांना जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३८ किलो अफूची बोंडे जप्त करण्यात आली असून त्याची किंमत सुमारे ७६ हजार रुपये आहे. कोडीत या गावातील हे शेतकरी आहेत.
किरण कुंडलीक जगताप (वय ४०) व रोहिदास चांगदेव जगताप (वय ५५, रा. कोडीत, ता. पुरंदर) अशी या दोघांची नावे आहेत.
जेजुरी पोलिसांना मावडी परिसरात अफूची लागवड केली जात असल्याची माहिती मिळाली होती.त्यामुळे जेजुरी आणि भोर पोलिसांची पथके मावडीतील जगताप मळ्यानजिकच्या कवठीचा मळा परिसरात गेली. तेथे दोन शेतात कांदा आणि लसूणपिकांमध्ये अफूची लागवड केली असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी या शेतांमधून ३८.२८ किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली असून त्यांची किंमत सुमारे ७६ हजार ५६० रुपये इतकी होत आहे.
आठवडाभरापूर्वी कोडीत गावातील दोघांना अफू लागवड केल्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय अधिकारी श्रीकांत पांडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब पवार, जेजुरी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक वाकचौरे , उपनिरीक्षक महेश पाटील, नामदेव तारडे, अंमलदार विठ्ठल कदम, शुभम भोसले, तात्यासाहेब खाडे, दशरथ बनसोडे, भानुदास सरक यांनी केली.
Discussion about this post