Pune news : पुणे : पुण्यात सध्या उन्हाचा कहर झाला असून मागील २४ तासात पुण्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू वस्तीसह काही भागात ४३ अंशावर तापमान नोंदले गेले. मागील अकरा वर्षातील हा उच्चांक आहे.
मागील आठवडाभरापासून पुण्यातील तापमान मागील दिवसापेक्षा दररोज जवळपास १ अंशाने वाढत आहे. या असह्य उकाड्यामध्ये काही परिसरात झालेल्या पावसाने भरच पडली आहे. पावसामुळे हवेतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुले उकाड्याने नागरिक अक्षरशः गुदमरत आहेत.
दुपारी रस्त्यांवरील पादचार्यांची वर्दळ मंदावत आहे. या सर्वात रस्त्यांवरील मुके प्राणी आणि उन्हातान्हात कष्टाची कामे करणारे कष्टकरी कामगार यांच्या हालांना पारावार राहिलेला नाही.
काही सजग नागरिक आणि संस्थांनी पशुपक्षांसाठी बाहेर मातीच्या पसरट भांड्यात पाणी ठेवण्यास सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी वाटसरुंसाठी पाण्पोईची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, उष्म्याचे प्रमाण पाहता नागरिकांनी मोठ्याप्रमाणात यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
Discussion about this post