व्हीएसआरएस मराठी न्युज -कुस्ती क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेला अखेर मुहूर्त मिळाला असून, आगामी महिन्यात म्हणजे 4 ते 9 एप्रिल या कालावधीत सातारा येथे या स्पर्धेचे आयोजन होणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षी ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र आता ही स्पर्धा होणार असल्याने कुस्तीपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे यांनी ही माहिती दिली. कात्रज येथील मामासाहेब मोहळ कुस्ती संकुलात गुरुवारी परिषदेच्या पदाधिकाऱयांमध्ये झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात 64 वी वरिष्ठ गट गादी, माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व ‘महाराष्ट्र केसरी’ किताबी लढत रंगणार आहे.
याचबरोबर ज्युनियर व सबज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी 18 ते 20 मार्च या कालावधीत पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील मारुती सावजी लांडगे कुस्ती संकुलात पार पडणार आहे.
Discussion about this post