गांधीनगर ।
गुजरात काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पक्षावर टीकेची झोड उठवल्यानंतर राजकारण तापलं आहे. पटेल हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा अखेर खरी ठरली आहे. त्यांनी पक्षाला रामराम केला आहे. राजीनामा देताच हार्दिक पटेल हे गायब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आज मी मोठ्या धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातची जनता स्वागत करेल. मला विश्वास आहे की माझ्या या पावलानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन, असे ट्विट करीत हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. यानंतर लगेचच हार्दिक पटेल हे गायब झाले आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नुकतेच राज्यात दाखल झाले होते. हार्दिक पटेल हे पाटीदार समाजाचे ताकदवान नेते आहेत. ते नाराज असल्याने पक्षातील मतभेद उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर खुद्द राहुल गांधी यांच्यासोबत हार्दिक पटेल मंचावर दिसले होते. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात राहुल गांधींनी पटेल यांना भेट देणे टाळले होते. तसेच, त्यांच्याशी चर्चाही केली नव्हती. त्यामुळे नंतर काही दिवसांतच पुन्हा एकदा हार्दिक पटेल यांनी पक्ष नेतृत्वाला आणि इतर नेत्यांना इशारा दिला होता.
हार्दिक पटेल यांनी म्हटलं होतं की, माझा दिल्लीत कुणी गॉडफादर नाही. त्यामुळं मला काम करून दाखवावं लागेल. मला तुम्ही पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष बनवलं परंतु, माझ्या जबाबदारी काय असतील हे स्पष्ट केलं नाही. दोन वर्षे झाली तरी तुम्हाला माझ्या जबाबदाऱ्या निश्चित करता आलेल्या नाहीत. माझ्यासोबत राज्यातील नेत्यांनी अद्याप एकही मोठी पत्रकार परिषद घेतलेली नाही. विधानसभा निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. याचवेळी लोकांनाही माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे पक्षाने माझी जबाबदारी निश्चित करुन द्यावी.
अंकुश काकडेंनी मला मारायला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाठवले; भाजपच्या आंबेकरांचा गौप्यस्फोट
काही दिवसांपूर्वी पटेल यांनी पक्षात दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप केला होता. नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी माझी पक्षात अवस्था झाली आहे, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षांनीच केलेल्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र, काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर पटेल यांनी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केलं होतं.
Discussion about this post