व्हीएसआरएस न्युज – अक्रम शेख प्रतिनिधी पिंपरी-
पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपली आहे. शहरातील अनेक प्रभागात चार वर्षांपासून अज्ञातवासात गेलेले लोकप्रतिनिधी अर्थात नगरसेवक हे आता खडबडून जागे झाले आहेत. मात्र ते अज्ञातवासात असताना प्रभागातील सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जात क्षेत्रीय प्रभाग सदस्यांनी आपल्या कामाचा दबदबा निर्माण केला असून आगामी निवडणुकीत उमेदवारीसाठी हे प्रबळ दावेदार ठरण्याची शक्यता असल्याने विद्यमानांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
दोन वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिके अंतर्गत येणार्या क्षेत्रीय प्रभाग सदस्यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे आमदार
लक्ष्मण जगताप आणि विद्यमान शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी आपल्या निकटवर्तीय व निष्ठावंत तसेच कर्तृत्ववान कार्यकर्त्यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करीत त्यांना काम करण्याची संधी दिली. या संधीचे सोने करीत अनेक स्वीकृत सदस्यांनी आपापल्या प्रभागात अतिशय चांगले काम करीत सर्वसामान्य नागरिकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.
त्यामध्ये प्रामुख्याने ‘ग’ प्रभाग सदस्य गोपाळ काशीनाथ माळेकर, ‘फ’ प्रभाग सदस्य दिनेश लालचंद यादव, ‘ड’ प्रभाग सदस्य संदीप भानुदास नाते, ‘ब’ प्रभाग सदस्य विठ्ठल बबन भोईर, ‘क’ प्रभाग सदस्य वैशाली प्रशांत खाडे, ‘ह’ प्रभाग सदस्य कुणाल दशरथ लांडगे या
स्वीकृत सदस्यांनी मागील दोन वर्षांपासून सातत्याने प्रभागातील विकासकामांबाबतीत तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्ये बाबतीत महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही कामे व समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची दखल घेत आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांच्याकडूनही वारंवार त्यांच्या कार्याचे कौतुक केले जाते.
प्रभागातील नागरिकांनाही आपल्या समस्यांसाठी विद्यमान नगरसेवकांपेक्षा हे स्वीकृत सदस्य जवळचे व हक्काचे वाटतात. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी हे स्वीकृत सदस्य उमेदवारीचे प्रबळ दावेदार ठरु शकतात. तसेच त्यांना उमेदवारी मिळाल्यास निवडणुकीत सर्वसामान्य जनता त्यांना त्यांच्या कार्याची पावती नक्कीच देईल.