व्हीएसआरएस न्युज पिंपरी-मंगळवारी महापालिकेकडून प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार शहरातील 894 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेणाऱ्या 6 अशा एकूण 900 जणांना करोनाची लागण झाली आहे.
शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करुन कोरोना नियमांचे उल्लंघन करु नये अन्यथा शहराला लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन सहकार्य करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. कोरोना प्रतिबंधक लस शहरातील प्रत्येक नागरिकाला मोफत देण्यासाठी महापालिकेने नियोजन करावे अशी सूचनाही महापौर ढोरे यांनी यावेळी महापालिका प्रशासनाला केली.
आतापर्यंत शहरातील एकूण 1 लाख 15 हजार 648 जणांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये करोनामुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतपर्यंत शहरातील 1885 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असताना 790 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात 552 करोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 6 हजार 481 झाली आहे.
सातत्याने वाढत असलेल्या करोना रुग्णांमुळे शहरातील उपचाराधीन करोनाबाधितांची संख्या तब्बल 7282 इतकी झाली आहे. त्यापैकी केवळ 1633 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 5649 रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.