Pimpri News : पिंपरी : लोकसभेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होण्याची चिन्हे असून राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार त्यादृष्टीने कामाला लागले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी मागील निवडणुकीत उपमुख्यंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. आता पुन्हा एकदा खासदार बारणे यांनी निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. अशी स्थिती असताना मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळावी असा ठराव वडगाव मावळ येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आला असल्याचे वृत्त आहे.
या बैठकीस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका कार्याध्यक्ष साहेबराव कारके यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या ठरावामुळे पार्थ पवार हे पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तविला जात आहे.
ही मागणी करताना मावळ मतदारसंघात अजित पवार गटाचे २ आमदार असून मावळ तालुक्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. तसेच कर्जत, पनवेलसह उरण मतदारसंघातही राष्ट्रवादीचा प्रभाव असल्याने ही जागा राष्ट्रवादीला मिळणे योग्य राहील असा दावा करण्यात आला आहे.
मात्र, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे भाजप नेत्यांशीही सलोख्याचे संबंध आहेत. मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत पार्थ पवार यांचा दणदणीत पराभव करून ‘जायंट किलर’ ठरलेल्या खासदार बारणे यांना पुन्हा उमेदवारी मिळावी म्हणून शिवसेना आग्रही राहण्याची आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व त्याला सहमती देण्याची शक्यता असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान,भाऊसाहेब भोईर व संजोग वाघेरे यांची नावेदेखील चर्चेत असल्याचे समजते.
Discussion about this post