Pune News : पुणे : पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथे कारखान्यात दि. ८ डिसेंबर रोजी झालेल्या स्फोटात होरपळल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असून पिंपरी चिंचवड महापालिकेने जखमी रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी एक वैद्यकीय अधिकारी आणि दोन मदतनीस असे तिघांचे पथक ससून रुग्णालयात ठेवले आहे. हे पथक जखमी रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी २४ तास रुग्णालयात हजर असणार आहे.
तळवडे येथे दि. ८ रोजी स्पार्कल्स बनविणा-या कारखान्यात स्फोट झाला. यावेळी तेथे काम करणा-या ६ महिलांचा मृत्यू झाला. तर अन्य १० जण जखमी झाल्या. त्यापैकी दोघींचा दि. ९ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. तर, एका महिलेचा रविवारी मृत्यू झाला. यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या ९ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या अन्य महिलांची प्रकृतीही चिंताजनक आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला. राज्यशासनाने मृतांच्या वारसांना ५ लाखाची मदत जाहीर केली.जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जात आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी ससून रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि आज रविवारी तळवडे येथे दुर्घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.
Discussion about this post