व्हीएसआरएस न्युज मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा एकदा वाढू लागला असून आर/मध्य बोरिवली, के/पूर्व अंधेरी-जोगेश्वरी पूर्व, टी मुलुंड आणि एम/पश्चिम चेंबूर-टिळकनगर भागात दैनंदिन रुग्णवाढ 10 टक्क्यांवर गेली आहे.
त्यामुळे हे चारही प्रभागांची ‘कोरोना हॉटस्पॉट’कडे वाटचाल सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या प्रभागांत इमारतींमध्येच सर्वाधिक रुग्णवाढ होत आहे.
मुंबईत 1 फेब्रुवारीपासून लोकल सुरू झाल्यापासून 334 पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता सुमारे पाचशे ते सहाशेपर्यंत नोंद होत आहे. लोकल-बाजारातील गर्दीत मास्क वापरला जात नसल्यामुळेच मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. बाजार, सार्वजनिक ठिकाणे, कार्यक्रम स्थळांसह गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियम कठोर पाळावेत आणि ‘सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझर’ या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन पालिकेने केले आहे.
सक्रिय रुग्ण वाढताहेत
बोरिवलीत सध्या 410 सक्रिय रुग्ण असून या ठिकाणी 43 इमारती सील करण्यात आल्या आहेत. चेंबूर-टिळकनगर भागात सरासरी वाढ 0.26 टक्क्यांवर गेली आहे. दररोज येथे 90 टक्के रुग्णवाढ इमारतींमध्ये होत असल्याचे समोर आले आहे. एम/पश्चिम प्रभागात 500 इमारतींना इशारा पत्र पाठवण्यात आले.
n एम पश्चिममध्ये कोरोनाचे 176 सक्रिय रुग्ण असून 35 इमारती सील करण्यात आल्या आहेत.
n टी विभागात 295 सक्रिय रुग्ण असून या ठिकाणी तब्बल 171 इमारती सील आहेत. n के पूर्व विभागात 341 सक्रिय रुग्ण असून या ठिकाणी 5 इमारती सील आहेत.
मुंबईत 545 इमारती सील
कोरोना रुग्ण आढळल्यामुळे पालिकेकडून इमारती सील करण्यात येत असून मुंबईत सद्यस्थितीत तब्बल 545 इमारती सील आहेत. यामध्ये 78 हजार घरांमधील 3 लाख 39 हजार रहिवासी सील इमारती म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्रात आहेत. तर मुंबईत सध्या चाळी-झोपडपट्टय़ांमध्ये मात्र कोरोना आटोक्यात असून या ठिकाणी फक्त 61 कंटेनमेंट झोन उरले आहेत.
एम/पश्चिम विभागात रुग्णवाढ रोखण्यासाठी सोसायटय़ांना कोरोना खबरदारीचे नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी इशारा पत्र पाठवण्यात आले आहे. सोसायटय़ांनी नियम मोडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. रहिवाशांनी स्वतःहून पुढाकार घेऊन नियम पाळले पाहिजेत. – पृथ्वीराज चौहान, सहायक आयुकत, एम-पश्चिम