। मुंबई । व्हीएसआरएस न्यूज ।
राज्यात सत्तानाट्य सुरू असताना यंदा आषाढी एकादशीदिवशी विठ्ठलाची शासकीय महापूजा कोण करणार? या प्रश्नाची चर्चा होतीच. दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. मात्र मुख्यमंत्री होऊनही एकनाथ शिंदे शासकीय महापूजेला मुकणार का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. हा दौरा संपवून ते आजच शासकीय महापूजेसाठी पंढरपूरात जाणार आहेत. एकादशीदिवशी पहाटे ते शासकीय महापूजा करतील. मात्र या सगळ्या दरम्यान राज्यातल्या नगरपालिका निवडणूकजाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पंढरपूर दौऱ्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
ही परवानगी मिळाली तरच एकनाथ शिंदेंना शासकीय महापूजेसाठी पंढरपूरात जाता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी परवानगी मिळाली की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे शासकीय महापूजा करणार की नाही, हे आता निवडणूक आयोगाच्या हातात असणार आहे.
Discussion about this post