पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे येथे काल दि. ८ डिसेंबर रोजी स्पार्कल्स बनविणा-या कारखान्यात झालेल्या स्फोटात ६ महिलांचा मृत्यू झाला होता. रात्री उशिरा या प्रकरणी जागामालक आणि कंपनी मालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जन्नत नजीर शिकलगार, नजीर अमिर शिकलगार (राहणार मोहननगर, चिंचवड) अशी जागामालकांची नावे आहेत तर; शुभांगी शरद सुतार (वय ३५), शरद सुतार (वय ४०, दोघे रा.पिंपरी सांडस, अशातपुरा फाटा, हवेली, पुणे) अशी कंपनी मालकांची नावे आहेत. शिकलगार यांंच्या या जागेत सुतार दाम्पत्य शिवराज एंटरप्रायझेस ही कंपनी चालवत होते.
या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब विश्वनाथ वैद्य (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे.
बेकायदेशीर व विनापरवाना स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थांचा वापर केला. कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. आग विझविण्यासाठी कोणतीही यंत्रणा कारखान्यात नव्हती. कंपनी बेकायदेशीरपणे आणि विनापरवाना चालू ठेवून सहा कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
जखमी १० जणांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी चार महिलांची प्रकृती चिंताजनक आहे.
Discussion about this post