पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील वाकड येथील पीएमपीएमएलसाठी आरक्षित असलेला भूखंड खासगी विकसकाला विकसित करण्यासाठी देण्यात आला असून याबद्दल विधानसभेचे विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनात आवाज उठविला. त्यांनी हा घोटाळा सुमारे ५०० कोटी रुपयांचा अस्ल्याचे म्हटले असले तरी या घोटाळयाची व्याप्ती त्याहूनही मोठी आहे. यामध्ये सुमारे १५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून याला साह्य करण्यासाठी पालिका प्रशासनातील अधिका-यांना १० टक्के आणि तीनही आमदारांना १० टके मलिदा खायला मिळाला आहे. असा खळबळजनक आरोप शहरातील महाविकास आघाडीतील पक्षांचे शहराध्यक्ष आणि प्रमुख नेत्यांनी दि. १५ डिसेंबर रोजी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत केला.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँगेसचे शहराध्यक्ष कैलास कदम आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यासह माजी नगरसेविका सुलक्षणा धर, देवेंद्र तायडे आदी उपस्थित होते.
१५०० कोटींचा भ्रष्टाचार
यावेळी बोलताना तुषार कामठे म्हणाले; हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे म्हटले असले तरी; प्रत्यक्षात हा घोटाळा १५०० कोटी रुपयांचा आहे. यामध्ये महापालिकेचे अधिकारी आणि शहरातील तीन आमदार यांना टक्केवारी मिळाली आहे असा आपला थेट आरोप आहे. पालिका प्रशासनातील अधिका-यांना १० टक्के आणि तीनही आमदारांना १० टके मलिदा खायला मिळाला आहे.
या भूखंडाचे विकसक मे. विलास जावडेकर या फर्मने नुकताच १५० कोटी रुपयांचा टीडीआर मिळण्यासाठी डीआरसी दाखल केली असून ती येत्या २ दिवसात थांबविण्यात आली नाही तर या प्रकरणी जनआंदोलन उभारू. तसेच; न्यायालयात दाद मागू.
आरक्षणे विकसकांना देऊन मलिदा खाण्याचा उद्योग
माजी आमदार आणि शिवसेना ठाकरेगटाचे नेते गौतम चाबुकस्वार म्हणाले. महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासनातील अधिकारी शहरातील आरक्षणे खासगी विकसकांच्या घशात घालू पहात आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असताना पालिका स्वतः आरक्षणे विकसित न करता मोक्याच्या जागा खासगी विकसकांना देत आहे. त्यातून टक्केवारीचा मलिदा खाण्याचे उद्योग सुरू आहेत. पिंपरी भाजीमंडईचे टेंडरही खासगीकरणातून काढण्याचा उद्योग सुरू आहे. आयुक्तांना माजी नगरसेवकांना भेटायला वेळ नाही. हे प्रकार थांबले नाहीत तर आंदोलने उभारू
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पालिकेच्या तिजोरीवर डल्ला
शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष अॅड. सचिन भोसले म्हणाले; टीडीआर घोटाळा आताच का झाला याचा विचार केला की लक्षात येईल की हा सर्व प्रकार म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणे आहे.महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून मनमानी करत आहेत.या घोटाळ्याला राज्यकर्त्यांची मदत आहे. हे एक प्रकरण उघडकीस आले असले तरी अशी पालिकेत अनेक प्रकरणे आहेत. याकडे आमदार आणि पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे अन्यथा आम्ही जन आंदोलन उभारल्याशिवाय आणि न्यायालयात गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
स्थायीसमितीच्या अध्यक्षाला लाचखोरीच्या गुन्ह्यात अटक हा भाजपच्या भ्रष्टाचाराचा ढळढळीत पुरावा
काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले; भाजपने मागील पाच वर्षात महापालिकेत सत्ता उपभोगली त्यानंतर दोन वर्षे प्रशासकईय कारभार चालू आहे. या काळात भाजपने पालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला. त्यांच्या सत्ताकाळात स्थायीसमितीच्या अध्यक्षाला लाचखोरीच्या गुन्ह्यात अटक झाली हा याचा ढळढळीत पुरावा आहे.
शहरात एकंदर २५०० कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा
यावेळी तुषार कामठे म्हणाले; वाकड येथील या भूखंडाची माहिती मागण्यासाठी पालिकेकडे ९ लोकांनी माहितीच्या अधिकारात अर्ज केले आहेत. परंतु त्यांना माहितीच देण्यात आलेली नाही. मला काल साडेआठ हजार रुपये घेऊन माहिती देण्यात आली. तथापि. मी जावडेकर आणि महापालिका यांच्यात झालेल्या करारनाम्याची प्रत मागितली होती हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज मला देण्यातच आलेला नाही. राज्यसरकारचा या प्रकरणात थेट हस्तक्षेप आहे. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खाते आहे. त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी यात लक्ष घातले पाहिजे. पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची राहण्रर आहे.शहरात एकंदर २५०० कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा असल्याचा आपला अंदाज आहे. या प्रकरणी ८ दिवसात कार्यवाही झाली नाही डीआरसी थांबवल्या नाहीत तर आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार हे नक्की
Discussion about this post