Breaking News : सुरत : पेंटागॉन हे अमेरीकेतील सीआयएचे मुख्य कार्यालय आजवर जगातील सर्वात मोठे कार्यालय म्हणून ओळखले जात होते. भारतातील सुरत डायमंड बोर्स या सुरतजवळील खजोद गावात उभारलेल्या इमारतीने आज हा विक्रम मोडीत काढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज १७ डिसेंबर रोजी या इमारतीचे उद्घाटन झाले.
मागील ८० वर्षे पेंटागॉन ही जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत म्हणून ओळखली जात होती. तिचे क्षेत्रफळ 66 लाख 73 हजार 624 चौरस फूट आहे. तर सुरत डायमंड बोर्सचे क्षेत्रफळ 67 लाख 28 हजार 604 चौरस फूट आहे. अर्थात ही इमारत पेंटागॉनपेक्षा 55 हजार चौरस फूट मोठी आहे.
पंतप्रधान मोदी यांनी या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यानंतर एक्सवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये ही इमारत सुरतमधील हिरे व्यापाराला चालना देणारी ठरेल असे म्हटले आहे.
या इमारतीत दागिने, रफ आणि पॉलिश केलेले हिरे यांच्या व्यापाराचे जागतिक केंद्र असणार आहे. आयात निर्यातीसाठी या इमारतीत कस्टम क्लिअरींग हाऊस असेल. बँकिंग सुविधा आणि सेफ डिपॉझिट व्हॉल्ट देखील असणार आहे.
या इमारत संकुलात ८१ मीटर्स उंचीचे एकूण ९ टॉवर्स असून ते एकमेकांशी जोडलेले आहेत. इमारतीमध्ये १३१ लिफ्ट आहेत. साडेचार हजार चारचाकी आणि १० हजार दुचाकी पार्किंगची सोय येथे असेल. या संकुलात साडेचार हजार कार्यालये असतील त्यात ६५ हजार कर्मचारी काम करतील.
फेब्रुवारी २०१५ मध्ये गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते या संकुलाचा भूमीपूजन समारंभ पार पडला होता.
पूर्वी मुंबईत असलेल्या अनेक हिरे व्यापाऱ्यांनी त्यांची कार्यालये आधीच ताब्यात घेतली आहेत.यामुळे मुंबईतील हिरे व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Discussion about this post