व्हीएसआरएस मराठी न्युज -इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाच्या ‘कॅप’ जागांसाठी पहिली विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. या फेरीत कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत (ता.२९) मुदत दिली आहे.
या फेरीतील गुणवत्ता व निवड यादी येत्या शुक्रवारी (ता.२) जाहीर होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश सुरू आहेत. या प्रक्रियेतील पहिल्या तीन नियमित प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्या असून आता प्रवेशाची पहिली विशेष फेरी सुरू झाली आहे.
या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भाग एक संपादित करण्यासाठी आणि अर्जांचा भाग दोन म्हणजेच पसंतीक्रम देण्याची प्रक्रिया सोमवारपर्यंत (ता.२९) सुरू राहील. या कालावधीत प्रवेश घेतलेले विद्यार्थी गरज असल्यास आपला प्रवेश रद्द करून लगेच पसंती अर्ज भाग दोन भरू शकतील. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी करण्याच्या अंतर्गत कार्यवाहीसाठी मंगळवार (ता.३०) ते गुरुवार (ता.१) असा कालावधी देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय निवड यादी शुक्रवारी (ता.२) संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल. या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २ ते ७ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती संबंधित पोर्टलवर ऑनलाइन नोंदविण्यासाठी महाविद्यालयांना ७ सप्टेंबर रात्री आठ वाजेपर्यंत मुदत दिली आहे. तर पुढील प्रवेश फेरीसाठी ८ सप्टेंबर रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे. या कालावधीत कोटांतर्गत प्रवेशाची चौथी फेरी आणि द्विलक्षी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू राहणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी सूचना
– विशेष फेरीसाठी पसंती अर्ज भाग दोन पुन्हा भरून लॉक करणे आवश्यक
– संमती न दिल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश फेरीत सहभागी होता येणार नाही
– विशेष फेरीमध्ये पसंतीक्रम आणि गुणवत्तेच्या आधारे प्रवेश होतील
– पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या, एटीकेटीची सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर प्रवेशाची व्यवस्था करण्यात येईल
– प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना द्विलक्षी विषय घ्यायचा असल्यास त्यांनी आपल्या लॉगिनमधून त्या विषयासाठी ऑनलाइन पसंती नोंदवावी
Discussion about this post