पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजारामुळे आज निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता.
सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या होत्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी रुग्णालयात जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. काही दिवसापूर्वी बापट यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यामुळे ते आपल्या घरीच विश्रांती घेत होते.
मात्र ऑक्सिजनची श्वसन नलिका त्यांना लावलेली होती. अशा परिस्थितही बापट यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी कसबा कार्यालय गाठलं होतं. तेव्हा त्यांनी भेटलेल्या कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणे विचारपूस केली. यामुळे कार्यकर्ते कमालीचे आनंदी झाले होते. त्यावेळी ‘पुण्याची ताकद, गिरीश बापट’ या घोषणेने परिसर अक्षरशः दणाणून निघाला होता. कार्यकर्त्यांमध्ये कट्ट्यावर बसून गप्पांचा फड रंगविण्याची त्यांची हातोटी होती.
Discussion about this post