नवी दिल्ली : सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. आज दि. १३ रोजी लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षकांच्या गॅलरीतून दोघांनी सभागृहात उड्या टाकल्या. यामुळे सदनात एकच गोंधळ उडाला. काही खासदारांनी या दोघांना पकडले आणि संसदेच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकारामुळे पीठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब केले.
या प्रकरणी काँगेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार साधारण 20 वर्षांच्या दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली. त्यातल्या एकाच्या हातात स्मोकगन होती तीमधून पिवळा धूर निघत होता. यातला एक तरुण लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे जाण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी करत होता. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून दिल्ली पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक त्यांची चौकशी करत आहे. या पैकी एकाचे नाव सागर असे आहे.
उड्या टाकणारे दोघेही म्हैसूरचे खासदार प्रताप सिंहा यांच्या नावे व्हिजिटर पास घेऊन संसदेत शिरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभेबाहेरही एक तरुण आणि स्त्रीने घोषणाबाजी केली असल्याचे वृत्त असून त्यातील एक महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील असून त्याचे नाव अमोल शिंदे असे असल्याचे वृत्त आहे. तर स्त्री हिस्सार येथील असून तिचे नाव निलम आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Discussion about this post