Pimpri News : पिंपरी : नंबरप्लेट नसलेल्या मोटारसायकलवरून जाणार्या तिघांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही ते न थांबता पळून जाऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे बनावट नोटा आढळल्या. त्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील एक अल्पवयीन आहे. या तिघांनी नोटा घरीच छापल्याची कबुली दिली. मात्र, खर्या नोटा आणि या बनावट नोटा यामध्ये असलेला सारखेपणा पाहून पोलीस त्यांनी दिलेल्या कबुलीबद्दल साशंक आहेत.
या प्रकरणी श्रीकांत चव्हाण या पोलीसाने हिंजवडी पोलीसठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून अभिषेक राजेंद्र काकडे (वय २०), ओंकार रामकृष्ण टेकम (वय १८) दोघेही राहणार हिंजवडी यांना अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.
ही घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी हिंजवडी माण रस्त्यावर घडली. हिंजवडी पोलिसांचे पथक या भागात फिरत असताना त्यांना एका विनानंबरप्लेटच्या मोटारसायकलवरून तिघेजण जात असल्याचे दिसले. त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. ते न थांबता पळून जाऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीमध्ये ५०० रुपयांच्या २४० बनावट नोटा आढळल्या. त्या कोठून आणल्या याची चौकशी केली असता. त्या घरीच छापल्याचे या तिघांनी पोलिसांना सांगितले. मात्र, ते खरे बोलत नसावेत असा संशय पोलिसांना आहे. कारण या नोटा खर्या नोटांसारख्याच दिसत आहेत. त्यामुळे या नोटा त्यांना राज्य अथवा देशाबाहेरील रॅकेटने पुरविल्या असाव्यात असे पोलिसांना वाटत आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Discussion about this post