Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेत झालेल्या १५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण थंड झाले असे पालिका प्रशासनाला वाटत असतानाच आज पुन्हा या प्रकरणाने उचल खाल्ली. संभाजी ब्रिगेडने या प्रकरणी पालिकेचे नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड हे या प्रकरणाची मुख्य सूत्रधार असून त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे या मागणीसाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. यावेळी पालिका प्रशासनाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
वाकड येथील पीएमपीएमएलसाठी राखीव असलेला भूखंड मे. विलास जावडेकर इन्फिनिटी प्रा.लि. यांना खासगीरित्या विकसनासाठी देण्याचा निर्णय पालिका प्रसासनाने घेतला. या प्रकरणात सध्याच्या रेडीरेकनर दरापेक्षा सुमारे दुप्पट दराने या विकसकाला टीडीआर देण्यात आला. सर्वप्रथम राज्याचे विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनात हा भ्रष्टाचार सभागृहासमोर आणला. त्यानंतर आक्रमक झालेल्या विरोधीपक्षांनी पत्रकार परिषद घेत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी असून या प्रकरणात सुमारे १५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाला स्थगिती देण्याचे जाहीर केले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणात संशय घ्यायला वाव असल्याचे म्हणत या प्रकरणाला स्थगिती देण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान या प्रकरणाशी संबंधित असलेले नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड यांच्यावर कारवाईचा आग्रह संभाजी ब्रिगेडने धरला असून त्या अनुषंगाने आज आंदोलन केले आहे.,
Discussion about this post