व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी: निगडी सेक्टर २२ मधील परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून काही अज्ञात इसम संशयास्पदरित्या वावरत आहेत. त्यांच्याकडे अनेक गुगल मॅप प्रिंट तसेच विविध प्रकारच्या मशिन्स आहेत. डिजिटल कॅमेर्यातून ते फोटो तसेच व्हिडिओ शुटींग काढत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे निगडी से.२२ मधील परिसरामध्ये संशयास्पदरित्या वावरणाऱ्या सदर इसमांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत दिपक खैरनार यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चार अनोळखी लोक वाहन क्र.MH-12 MX-4176 तसेच MH-12 UP-7196 या दुचाकीवर निगडी से.22 या संपूर्ण परिसराची रेकी करत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. दिवसभर घरातील कर्ते पुरुष कामाला गेलेले असतात. त्यावेळेस घरी लहान मुले व महिला असताना हे अनोळखी इसम परिसरामध्ये गस्त घालून, घरामध्ये डोकावणे परिसरामध्ये संशयास्पद हालचाली करणे, अशी कृत्ये करत आहेत. त्यांच्याकडे गुगल मॅप प्रिंट, डिजिटल कॅमेरे, इलेक्ट्रिक मशीन तसेच हत्यारासारखी अवजारे ते जवळ बाळगून असतात. दि.28 डिसेंबर 2023 रोजी या संदर्भात स्थानिक नागरिकांनी आम्हास कळविल्यानंतर आम्ही त्या इसमांचा शोध घेतला,यावेळी ते आम्हास बौद्ध नगर येथे दिसले. त्यातील एक इसम हा त्यांच्याकडे असणाऱ्या डिजिटल कॅमेरातून तो परिसराची व्हिडिओ शूटिंग करीत होता, तर दुसरा इसम हा गुगल मॅप पाहून एका डायरीमध्ये काहीतरी लिहीत होता.
यावेळी आम्ही त्यांना विचारणा केली असता, त्यांनी आम्हास उडवा-उडवीची उत्तरे दिली व त्यांनी तेथून पळ काढला. यावेळी मी माझ्या मोबाईलमध्ये त्यांचे फोटोज् काढले होते, ते या अर्जा सोबत जोडत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सदर अज्ञात इसमांचा शोध घेऊन हे कृत्य करण्यामागील त्यांचा नेमका हेतू काय आहे? हा सर्व डेटा ते कुणाला देत आहेत? त्यांनी काढलेले फोटोज् आणि व्हिडिओज ते कशासाठी वापरणार आहेत? अशा सर्व बाबी स्पष्ट होणे गरजेच्या आहेत.
त्यामुळे सदर अज्ञात इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर उचित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी दिपक खैरनार यांनी केली आहे.
Discussion about this post