व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष युवक अध्यक्ष महिला शहराध्यक्ष यांच्या बदलाचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. शहरातील 12 मार्च रोजी नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे त्यानंतर शहरात प्रशासक लागेल. त्यानंतर एप्रिल किंवा मे मध्ये निवडणुका होणार आहेत. १ फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर आता आरक्षण सोडत होईल. त्यामुळे निवडणूक कामाला व राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. महापालिकेत विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक फेरबदल करण्याचे निश्चित केले आहे. संजोग वाघेरे एप्रिल 2015 मध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष झाले. त्यांनी पक्षाच्या कठीण काळात 2017 ची महापालिका, लोकसभा व विधानसभा अशा तीन महत्त्वाच्या निवडणुकीत पक्ष संघटनेचे उत्तम कामगिरी केली. त्यांच्या तीन वर्षाच्या दोन टर्म पूर्ण झाल्या आहेत.
शहराध्यक्ष बदल पुढील दोन ते तीन दिवसात होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीत आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून सार्वत्रिक निवडणुकीला एक दिलाने सामोरे जावा असा कानमंत्र अजितदादांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला आहे.
शहराध्यक्षपदासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांचे नाव चर्चेत आहे. तर, युवक अध्यक्षपदासाठी माजी महापौर आझम पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे, महिला अध्यक्षपदासाठी माजी महापौर अपर्णा डोके आणि कविता आल्हाट यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
Discussion about this post