व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
शिरूर मतदारसंघाच्या सीमेवरील हवेली तालुक्यातील आळंदी- मरकळ- तुळापूर- लोणीकंद रस्त्याचे कामही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. सध्या तर या रस्त्याची खूपच दुर्दशा झालेली आहे.
जागोजागी खड्डे पडले असल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. तसेच इंद्रायणी नदीवरील पूलही कमकुवत झाला असून तो वाहतुकीसाठी धोकादायक बनला असल्याने या रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.या मागणीची दखल घेऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार ,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण आणि बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे यांच्याकडे या रस्त्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. आनंदाची बाब म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत एकूण रु. ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. लोणीकंद (रा.मा.११६) रस्त्यावरील कि.मी.३१/०० वरील इंद्रायणी नदीवरील पुलासाठी रु. ११ कोटी तर कि.मी. २१/४०० ते कि. मी. ३१/०० रस्त्यासाठी रु. १२ कोटी आणि कि.मी. ३१/०० ते कि.मी. ३८/०० या ७ कि.मी. लांबीसाठी १२ कोटी असा एकूण रु. ३५ कोटींचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच पुलाच्या कामाची निविदा प्रक्रियाही सुरू होणार आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी असलेल्या श्रीक्षेत्र आळंदी आणि छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर या धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या स्थळांना जोडणाऱ्या इतक्या महत्त्वाच्या या रस्त्याची ही दुरावस्था खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना ही पाहवत नव्हती,तेथील सर्व गोष्टी जाणून घेऊन खा. डॉ. अमोलदादा कोल्हें यांनी या रस्त्यासाठी तातडीने पाठपुरावा सुरु केला.
आता ही सर्व कामे लवकरच मार्गी लागतील आणि या परिसरातील नागरिक, वाहनचालक, नोकरदार, विद्यार्थी या सर्वांचा प्रवास सुकर व सुखकर होईल. कित्येक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल खा. डॉ. अमोलदादा कोल्हें यांचे आभार या सर्व भागातील नागरिकांनी मानले आहेत.कोविड संकटकाळात निधीची कमतरता असल्याने या रस्त्याच्या कामाला थोडा उशीर झाला असला तरी पालकमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल खासदार डॉ.अमोलदादा कोल्हे यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
Discussion about this post