व्हीएसआरएस मराठी न्युज –महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार १० ते १४ जानेवारी २०२३ या कालावधीत पुण्यात रंगणार आहे.
या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असून, कै. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, किनारा हॉटेल जवळ, कोथरूड, पुणे येथे हा थरार अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस व ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थाई समितीचे चेअरमन संजय कुमार सिंह, काकासाहेब पवार, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे, नवनाथ घुले, मेघराज कटके, दत्ता गायकवाड, संजय शेटे आणि पदाधिकारी, कुस्तीगीर आदी उपस्थित होते. विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात या कुस्त्या होतील.
६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’साठी कोथरूडमधील कै. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी सज्ज झाली आहे. ३० एकर जागेवर कुस्तीचा हा कुंभमेळा भरणार आहे. या मैदानाचे उद्घाटन मंगळवारी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते कुदळ मारून झाले. भव्य दिव्य स्वरुपात ही कुस्ती स्पर्धा होणार असून, माती व गादी विभागाचे आखाडे, ७० हजार लोक बसतील एवढी आसनव्यवस्था येथे करण्यात आली आहे.
Discussion about this post