व्हीएसआरएस मराठी न्युज –स्वच्छ भारत अभियानात शहराला अव्वल स्थानावर नेण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. कामकाजाचे स्वरूप व जबाबदारीबद्दल माहिती देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविणे आणि विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांची नोंदणी केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
शहराला देशात अव्वल स्थानावर आणण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. या मोहिमेला यशस्वी करण्याची महत्त्वाची भूमिका सफाई कर्मचारी बजावत असतात. त्याअनुषंगाने संबंधित अधिकारी, कर्मचारी व विभागांच्या कामकाजाचे स्वरूप व जबाबदारी निश्चित केली आहे. याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी दोन टप्प्यांत चार ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केले आहे. बुधवारी (ता. १६) सकाळी १० वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महापालिका प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन होईल. स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक विनोद जळक प्रशिक्षणाबाबत माहिती देतील. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ व आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर मार्गदर्शन करतील. प्रशिक्षणादरम्यान शून्य कचरा (झिरो वेस्ट) कार्यपद्धतीच्या मानक प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे, अशी माहिती जळक यांनी दिली.
Discussion about this post