Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्याच्या मुलाने त्यावेळी तेथे कामास असलेल्या डॉक्टरला बेदम मारहाण केली. हा प्रकार रविवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडला. त्यानंतर रुग्णालयातील संतप्त झालेल्या डॉक्टरांनी सायंकाळी आंदोलन केले.
या प्रकरणी डॉ. ऋषिकेश हणमंत कुदळे (वय 25, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून महेश राजाराम कुंभार (वय 25, रा. वाघोली, ता. वरुड, जि. धाराशिव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे वडील राजाराम कुंभार यांच्यावर वायसीएम रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती डॉक्टर कुदळे यांनी मृताच्या नातेवाईकांना दिली. वडिलांचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर आरोपीने रागाने डॉक्टर कुदळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
या प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Discussion about this post